
इराण-इस्रायल युद्धादरम्यान एमटी एमकेडी व्योम या जहाजावरील हल्ल्यात मृत्यू झालेले हिंदुस्थानी नाविक दीक्षित अमृतलाल सोलंकी यांचा मृतदेह दहा दिवसांनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेला नाही. कंपनीकडून ठोस माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सोलंकी कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. शिवसेना नाविक सेनेने याची गंभीर दखल घेत आज कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.
दीक्षित सोलंकी यांचे जहाज 1 मार्च रोजी होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना त्यावर मिसाइल हल्ला झाला. त्यात दीक्षित जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे नंतर पुढे आले. मात्र अद्याप त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नाविक सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी ‘व्ही शीप’ कंपनीचे अधिकारी सॅडलर यांची भेट घेतली. दीक्षित यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याची कल्पना त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. दीक्षित यांचा मृतदेह लवकरात लवकर ताब्यात घेऊन तो कुटुंबीयांना सुपूर्द करावा, अशी मागणी लोकरे यांनी केली. त्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिष्टमंडळात नाविक सेनेचे सहसचिव प्रवीण घाग, उपाध्यक्ष रणजीत कदम, जसप्रीत वढेरा, भूषण सांगळे, चिटणीस रितेश सावंत, दीशांत घाग यांचा समावेश होता.
नाविक सेनेने या संदर्भात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून केंद्रीय जहाज, बंदरे व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि नौवहन संचालनालयाचे संचालक जगन्नाथन यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मृत दीक्षित सोलंकी यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती द्यावी व त्यांच्या मुलाचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी सरकारने सर्व प्रकारची पावले उचलावीत, अशी मागणी पत्रातून केली.

























































