
स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या ठाण्यात महिला शौचालयांना दारेच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील शौचालयांना दरवाजे नसल्यामुळे महिलांना चक्क हाताने प्लायवूडचा आडोसा घेऊन प्रातर्विधी उरकावा लागत आहे. या गंभीर प्रकारामुळे ठाणे महापालिकेची अबू अक्षरशः उघड्यावर आली आहे. दरम्यान, शौचालयांचा कोट्यवधींचा निधी गेला तरी कुठे? महिलांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीची आता तरी दखल पालिका प्रशासन घेणार का? असा सवाल संतप्त महिलांनी केला आहे.
वीज, पाण्याची व्यवस्था करा
एकीकडे ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ आणि स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात असताना मात्र प्रत्यक्षात शौचालयांना दरवाजे नाहीत. प्रशासनाने दखल घेऊन या शौचालयांना दरवाजे बसवून पाणी व वीज आदींची व्यवस्था तत्काळ करावी अशी मागणी परिसरातील स्थानिक महिलांनी केली आहे.
तर मुख्यालयात ठिय्या
महिलांच्या शौचालयांना दरवाजेच नसणे ही ठाण्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून शौचालयांना दरवाजे बसविण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासन या पत्रव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सात दिवसांत शौचालयांना दरवाजे बसवले नाहीत तर पालिका मुख्यालयात ठिय्या मांडू असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत 1 हजार 350 सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन तब्बल 20 कोटी खर्च करते. परंतू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील संत ज्ञानेश्वर नगरात महिलांसाठी असलेल्या 10 सार्वजनिक शौचालयांपैकी केवळ दोनच शौचालयांना दरवाजे असून उर्वरित सर्व शौचालये दरवाजाविना असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे जागतिक महिला दिन सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होत असताना दुसरीकडे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी हातात प्लायवूड धरून महिलांना शौचालयात जावे लागत आहे.


























































