पंजाबच्या तरन तारनमध्ये बीएसएफची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने मोठी कारवाई केली. खेमकरण सेक्टरमध्ये सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी तस्कराचा बीएसएफच्या जवानांनी खात्मा केला. घुसखोर हिंदुस्थानच्या हद्दीत हेरॉइन तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती मिळते. मात्र बीएसएफने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेमकरण सेक्टर परिसरातील कालिया आणि नूरवाला चौकी दरम्यान ही घटना घडली. बीएसएफची 142 वी बटालियन परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद व्यक्ती सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, परंतु त्याने थांबण्यास नकार देत तो पुढे चालत राहिला. यानंतर बीएसएफने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी घुसखोर जागीच ठार झाला.

जवानांनी मृत घुसखोराकडून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी करत आहेत. गोळीबारादरम्यान काही इतर पाकिस्तानी तस्कर देखील उपस्थित होते, परंतु ते अंधाराचा फायदा घेऊन पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाले.

याप्रकरणी वलटोहा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पट्टी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलीस संयुक्तपणे या घटनेचा तपास करत आहेत.