‘सेंट्रल पार्क’मध्ये मुंबईकरांचे काय स्थान असणार? प्रकल्पावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीच उद्योग मंत्र्यांना घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेसकोर्सच्या पालिकेला मिळालेल्या 120 एकर जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्पावरून आज विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना चांगलेच धारेवर धरले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करणार असे सांगत असाल तर या ठिकाणी मुंबईकरांचे स्थान काय असणार, असा सवाल विरोधक-सत्ताधाऱ्यांनी उद्योग मंत्र्यांना केला. यावर उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत मुंबईतील सर्व आमदारांना या प्रकल्पाचे पेझेंटेशन देण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्र्यांनी सदस्यांना दिले.

शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्पावरून लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई सेंट्रल पार्कला तब्बल 102 वास्तुविशारदांनी विरोध केला आहे. असे असताना हा प्रकल्प उभारण्याची घाई प्रशासन का करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प नक्की कसा असणार, कोणत्या सुविधा असणार, या ठिकाणी कोणाला प्रवेश मिळणार, स्थानिकांसाठी किती टक्के प्रवेश आणि संधी मिळणार, सर्वसामान्यांसाठी कोणत्या सुविधा मिळणार, अशा प्रश्नांची सरबत्तीच आमदार अॅड. अनिल परब, भाजपचे प्रवीण दरेकर, सतेज पाटील आदींनीही सेंट्रल पार्कबाबत प्रश्न उपस्थित केले.

जेट्टीचा वापर हेलिपॅडसाठी

कोस्टल रोडच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या जेट्टीचा वापर हेलिपॅडसाठी करण्याच्या निर्णयाचा सदस्यांनी समाचार घेतला. खासगी संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याचा निर्णय का घेण्यात आला? प्रशासनाने आपला महसूल का बुडवला, असे सवालही या वेळी उपस्थित करण्यात आले.

व्यावसायीकरण करू नका!

या ठिकाणी होणाऱ्या सुविधांनंतर आंतरराष्ट्रीय खेळ खेळणार की स्थानिक खेळांना प्राधान्य देणार, प्रवेशासाठी पैसे आकारणार का? या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा केवळ टीव्हीवर पाहण्याची वेळ मुंबईकरांवर येणार नाही ना? प्रवेशाबाबत टक्केवारीचे प्रमाण राहणार का? नक्की कोणते खेळ खेळणार? असे सवाल सदस्यांनी उपस्थित केले. मुंबईची ही मोक्याची जागा कंत्राटदारांच्या घशात घालून व्यावसायीकरण करू नका, अशी जोरदार मागणी या वेळी सदस्यांनी केली.