
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पुन्हा एकदा हुरुन ग्लोबल रिचच्या लिस्टमध्ये चमकला आहे. यामुळे हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक म्हणून खानची प्रतिष्ठा मजबूत झाली आहे. हुरुन लिस्टमध्ये मनोरंजन उद्योगातील अनेक जागतिक व्यक्तींचाही समावेश आहे. जे-झेड, ज्याची एकूण संपत्ती अंदाजे ₹2.8 अब्ज आहे. टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती 1.6 अब्ज आहे. तर रिहानाची एकूण संपत्ती 1.5 अब्ज आहे.
शाहरुख खानने यादीत आपले स्थान कायम ठेवले असले तरीही, मागील वर्षीच्या तुलनेत त्याची संपत्ती थोडी कमी झाली आहे असे अहवालात म्हटले आहे. 2025 मध्ये, त्याची एकूण संपत्ती अंदाजे 12 हजार 490 कोटी (अंदाजे 1.4 अब्ज) होती. यंदा त्याची संपत्ती ही 10 हजार 800 कोटी इतकी झालेली आहे.
शाहरुख खानची कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नाही. त्यांच्या मालकीची निर्मिती संस्था रेड चिलीज, ही बॉलिवूडमधील मोठ्या निर्मिती कंपन्यांपैकी एक मानली जाते. याशिवाय आयपीएलमधील कोलकाता नाईट राइडर्स संघातील भागीदारी, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर गुंतवणुकीमुळे त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ झाली आहे.
शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित त्याच्या आगामी “किंग” चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान देखील आहे. यात राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन आणि अनिल कपूर यांच्यासह अनेक प्रमुख कलाकार आहेत.


























































