सरन्यायाधीशांनी वकिलाला झापले; समाजसेवेसाठी एक कोटी कसले मागताय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना वाचवण्यासाठी 2018 मध्ये दाखल केलेल्या याचिकांसाठी 1 कोटी रुपये फी आणि खर्चाची मागणी करणारी याचिका वकील अशोक पांडे यांची दाखल केली होती. ही याचिका आज 12 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने या मागणीला पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे मानले. तसेच याचिका दाखल करणाऱया वकिलालाही जबरदस्त पैलावर घेतले.’ तुम्ही तर समाजसेवा केलाय. समाजसेवा अनमोल असते. त्याचे 1 करोड कसले मागता,’ असा उपरोधिक सवाल करत न्यायालयाने याचिका फेटाळली.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. 2018 साली माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग खटला चालवला जाणार होता. त्यावेळी त्यांना वाचवायला माझ्याशिवाय कुणीही पुढे आले नाही. या खटल्यासाठी 2 लाख खर्च झाले होते. ते पैसे मुलीकडून घेतले, असा दावा याचिकाकर्ते वकील अशोक पांडे यांनी केला. त्यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी अशोक पांडे यांना चांगलेच सुनावले. तुम्ही तर स्वतःहून कोर्टात हजर राहिला होता. तुम्ही या समाजसेवेबद्दल पैशांची अपेक्षा करता कामा नये. तुम्ही संस्थेसाठी महान समाजसेवा केली आहे. हे काम अनमोल आहे. त्याची किंमत एक कोटी किंवा दोन कोटी रुपयांत करता येणार नाही. तुमची समाजसेवा सुरू राहू द्या, असे सरन्यायाधीश म्हणाले.

या प्रकरणात प्रयागराज हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अशोक पांडे यांची याचिका फेटाळली. एप्रिल 2018 मध्ये काँग्रेससह 7 विरोधी पक्षांनी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली होती.