
यूपीआय आणि ऑनलाईन पेमेंटमुळे एटीएमचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यातच एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. देशात चलनाचा तुडवडा तर नाही ना, असे प्रश्न पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने छोटय़ा नोटांची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच लवकर एटीएममधून 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळतील याची ग्वाही दिली आहे.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना बाजारात 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या चलनी नोटांची संख्या कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला. या नोटा बाजारात मोठय़ा प्रमाणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर लवकरच या नोटा एटीएममधून काढता येतील याविषयीची तरतूद सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंकज चौधरी म्हणाले, जुने एटीएम छोटय़ा नोटा वितरीत करण्यासाठी डिझाईन केलेले नाही. पण सरकारने गेल्या काही दिवसांपासून कमी मूल्याच्या नोटा म्हणजे 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा वितरीत करण्यासाठी प्रयोग सुरू केला आहे. स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सरच्या माध्यमातून एक पायलट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या एटीएममधून 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा नागरिकांना मिळतील. ही एटीएम वेगळी असतील. अथवा मोठय़ा एटीएम केंद्रात ही मशीन वेगळी ठेवण्यात येईल. लवकरच हा प्रयोग देशभर राबविण्यात येणार आहे.
किती छोटय़ा नोटा चलनात
सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 26 फेब्रुवारीपर्यंत आरबीआयने 10 रुपयांच्या 439.40 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 193.70 कोटी नोटा आणि 50 रुपयांच्या 130.30 कोटी नोटा बाजारात आणल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 10 रुपयांच्या 180 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 150 कोटी नोटा आणि 50 रुपयांच्या 300 कोटी नोटा बाजारात आणण्यात आल्या.



























































