
देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील केटरिंग ऑपरेटर्सनी मायक्रोवेव्ह आणि इंडक्शनसारख्या विद्युत उपकरणाचा वापर करावा, अशी सूचना आयआरसीटीसीने दिली आहे. कोणत्याही युनिटमध्ये गॅस कुकिंग पूर्णपणे बंद असेल तर पर्यायी व्यवस्थेसाठी विभागाला कळवणे बंधनकारक आहे. हा नियम रेल्वे स्थानकांतील सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जन आहार आऊटलेटना लागू करण्यात आला आहे. हा नियम ट्रेनमधील पॅटरिंग सेवेसाठी नाही, असेही आयआरटीसीने स्पष्ट केले आहे. रेल्वेकडून ट्रेनमध्ये शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा विचार करत आहे.
अमेरिकेचा पाकिस्तानातील वाणिज्य दूतावास बंद

अमेरिकेने पाकिस्तानातील पेशावर येथील वाणिज्य दूतावास कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाणिज्य दूतावास अफगाणिस्तान सीमेजवळ होता. वाणिज्य दूतावास बंद करण्यात आल्याने अमेरिकेची दरवर्षी 75 लाख डॉलरची बचत होईल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा विचार गेल्या वर्षाभरापासून सुरू होता. वाणिज्य दूतावास बंद करण्याचा आणि इराणसोबत सुरू असलेल्या तणावाचा काहीही संबंध नाही, असेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इराण हल्ल्यानंतर कराची आणि पेशावर यासारख्या शहरात अमेरिकेविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
सराफा व्यापाऱ्याचे घर आणि दुकान लुटले

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका सराफा व्यापाऱ्याचे घर आणि दुकान एकाच वेळी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी जितेंद्र सोनी हे मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंबासोबत मध्य प्रदेशातील छतरपूरला गेले होते. त्यामुळे घर आणि दुकानाला कुलूप लावलेले होते. दुसऱ्या दिवशी घराचे कुलूप तोडलेले दिसल्यानंतर शेजाऱ्यांनी कुटुंबाला याची माहिती दिली. घराचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांना धक्का बसला. चोरटय़ांनी घर आणि दुकान लुटले होते. दुकानातून 52 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी, 35 हजारांची रोकड, तर घरातून आईचे 273 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 किलो चांदी आणि 50 हजारांची रोकड पळवली.
एअर इंडिया विमानाची फुकेट एअरपोर्टवर हार्ड लँडिंग

हिंदुस्थानातून थायलंडला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाची फुकेट विमानतळावर हार्ड लँडिंग करण्यात आली. या विमानाने हैदराबाद एअरपोर्टहून उड्डाण केले होते. या विमानात पायलटसह एकूण 140 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमानाची तपासणी केली. ज्या विमानात बिघाड झाला, ते विमान बोइंग कंपनीने बनवलेले आहे. बोइंग के 737-800 मॉडलच्या या विमानाची नोंदणी व्हीटी-बीडब्ल्यूक्यू आहे. हार्ड लँडिंग करण्यात आल्याने लँडिंग गिअरसोबत विमानाच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे, परंतु सुदैवाने विमानातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.























































