
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानमध्ये ड्रोन हल्ला झाला. झालेल्या या ड्रोन हल्ल्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला असून दहा हिंदुस्थानी नागरीक जखमी झाले आहेत, अशी माहिती हिंदुस्थान सरकारने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला ओमानमधील सोहार शहरातील अल अवाही औद्योगिक परिसरात शुक्रवारी झाला. सोहार हे ओमानची राजधानी मस्कतपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील गल्फ विभागाचे संयुक्त सचिव असीम महाजन यांनी सांगितले की, या हल्ल्यात 11 जण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जण हे हिंदुस्थानी नागरीक आहेत. जखमींपैकी पाच जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हिंदुस्थानी दूतावास स्थानिक प्रशासन आणि संबंधित कंपनीशी सतत संपर्कात असून सर्वतोपरी मदत करत आहे.
ओमानची अधिकृत वृत्तसंस्था ओमान न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, सोहार परिसरात दोन ड्रोन कोसळले. त्यापैकी एक ड्रोन औद्योगिक क्षेत्रावर आदळल्याने दोन परदेशी कामगारांचा मृत्यू झाला. इराण-अमेरिका संघर्ष 2026 सुरू झाल्यानंतर पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक हिंदुस्थानी जखमी झाले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियात राहणाऱ्या सुमारे 1 कोटी हिंदुस्थानींच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
सरकारच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे 1.5 लाख हिंदुस्थानी नागरिक पश्चिम आशियातील विविध देशांतून हिंदुस्थानात परतले आहेत. यामध्ये कतार, बाहरीन संयुक्त अरब अमिरातीमधून परतलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
























































