
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे शहरातील रहिवासी आणि लहान मुलांना श्वास घ्यायला मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडे दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. दीपिकाने आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक ‘स्टोरी’ शेअर केली. त्यामध्ये तिने मुंबईतील प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले. तसेच तिने महापालिका अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
तिने मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पह्टोसोबतच तिने बीएमसीला टॅग केले आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. शहराच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना तिने लिहिलेय की, मुंबईत राहणारे लोक विशेषतः लहान मुले हवेची गुणवत्ता खालावत असल्यामुळे गुदमरत आहेत. त्यासोबतच ‘हे कसे योग्य असू शकते?’, असा प्रश्न दीपिकाने उपस्थित केला.
याआधी रिचा चढ्ढा आणि सयामी खेर या अभिनेत्रींनीदेखील सोशल मीडियावरून मुंबईच्या दिवसेंदिवस खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती.



























































