
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध दोन आठवड्यांपासून सुरू आहे. या युद्धाच्या झळा जगाला बसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोप लिओ यांनी महत्त्वाची सूचना केली आहे. ऐन युद्धाच्या काळात त्यांची सूचना आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पोप लिओ यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्याचे किंवा संघर्षाचे नाव न घेता, अशी सूचना केली की, युद्ध सुरू करणाऱ्या ख्रिश्चन नेत्यांनी पाप-कबुलीसाठी (confession) जावे आणि आपण येशूच्या शिकवणीचे पालन करत आहोत की नाही, याचे आत्मपरीक्षण करावे. युद्धाच्या काळात त्यांनी ही सूचना केली आहे.
सशस्त्र संघर्षांमध्ये मोठी जबाबदारी पेलणाऱ्या त्या ख्रिश्चन नेत्यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचे गांभीर्याने परीक्षण करण्याची आणि पाप-कबुलीसाठी जाण्याची नम्रता व धैर्य आहे का? असा प्रश्न पोप यांनी धर्मगुरूंसमोर केलेल्या एका भाषणात उपस्थित केला. त्यांनी कोणत्याही नेत्याचे किंवा युद्धाचे नाव घेतले नसले तरी आखाती देशात शांतता प्रस्थापुत करण्यासाठी त्यांची ही सूचना असल्याचे मानले जात आहे.
सध्याची परिस्थिती खूपच बिकट असल्याचे ते म्हणाले. युद्धाच्या झळा वाढत आहेत आणि युद्धज्वर पसरत आहे, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाला देवाचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यानंतर पोप यांनी ही सूचना केली आहे. इराण युद्धादरम्यान ओव्हल ऑफिसमध्ये काही ख्रिश्चन नेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसले. त्यानंतर अमेरिकेच्या कॅथोलिक चर्चमधील प्रमुख व्यक्तींनीही या युद्धाविरुद्ध आवाज उठवला आहे. शिकागोचे कार्डिनल ब्लेस कुपिच यांनी व्हाईट हाऊसच्या एक्स अकाउंटवर युद्धाबद्दल पोस्ट केलेल्या व्हिडिओबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व घटना दुःखद असल्याचे ते म्हणाले. वॉशिंग्टन, डी.सी.चे कार्डिनल रॉबर्ट मॅकएलरॉय म्हणाले की, अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले नैतिकदृष्ट्या वैध नाहीत कारण ते न्याय्य युद्धाच्या कॅथोलिक शिकवणीतील निकष पूर्ण करत नाहीत. या युद्धाबाबत ख्रिश्चन धर्मगुरुंनी केलेल्या सूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.




























































