
मुंबई महानगरात उकाडय़ाने कहर केला आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडणे नकोसे झाले आहे. अशा स्थितीत लोकल प्रवासात फुकटय़ा प्रवाशांनी एसी ट्रेनमध्ये बिनधास्त घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील टीसींच्या पथकांनी 12 दिवसांत 4,430 प्रवाशांना फुकटात एसी ट्रेनचा ‘गारेगार’ प्रवास करताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 लाख 97 हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
मार्चच्या सुरुवातीपासून मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तापमान भयंकर वाढले आहे. त्यामुळे एसी ट्रेनमध्ये अवैध प्रवाशांचीही गर्दी होऊ लागली आहे. या फुकटय़ा प्रवाशांचा नियमित तिकीट काढणाऱयांच्या आरामदायी प्रवासाला ‘धक्का’ बसला आहे. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी ट्रेनमधील तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. विविध पथकांच्या माध्यमातून फुकटय़ांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने 28 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत एसी ट्रेनमधून अनधिकृत प्रवास करणाऱया 4,430 प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 14 लाख 97 हजार 225 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वे प्रशासनानेही एसी ट्रेनमधील फुकटय़ांवर वक्रदृष्टी रोखली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी एका दिवसात मेन लाइन आणि हार्बर लाइनवरील एसी ट्रेनमधून 443 फुकटय़ांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 37 हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

























































