
98 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा लॉस एंजिल्स येथील डॉल्बी थिएटरमध्ये आज पार पडला. लियोनार्डो डिकॅप्रियोचा ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाने सर्वाधिक 6 पुरस्कार पटकावले. या वर्षी 16 नामांकने मिळवून विक्रम करणाऱया ‘सिनर्स’ चित्रपटाला केवळ 4 पुरस्कार जिंकता आले. या चित्रपटासाठी मायकल बी. जॉर्डनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या श्रेणीत लियोनार्डोलाही नामांकन मिळाले होते. मात्र त्याला दुसरा ऑस्कर ऍवॉर्ड जिंकता आला नाही. तर, ‘हेमनेट’साठी जेसी बकले सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
या वर्षी कोणत्याही हिंदुस्थानी चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळवता आले नाही. हिंदुस्थानी वंशाच्या चित्रपट निर्मात्या गीता गंडभीर यांच्या 2 माहितीपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते, मात्र त्या दोन्ही माहितीपटांना पुरस्कार जिंकता आले नाहीत.
प्रियांका चोप्रा 2016 नंतर पुन्हा एकदा ऑस्कर अवॉर्ड प्रदान करताना दिसली. प्रियांकाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा अवॉर्ड दिला. यावेळी रेड कार्पेटवर पती निक जोनस हादेखील होता.
98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अमेरिकन चित्रपट ‘सिनर्स’ला सर्वाधिक 16 नामांकने मिळाली आहेत. यासह हा चित्रपट ऑस्करच्या इतिहासात सर्वाधिक नामांकनं मिळवणारा चित्रपट बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑल अबाऊट ईव्ह (1950), टायटॅनिक (1997) आणि ला ला लँड (2016) यांच्या नावावर होता, ज्यांना एकूण14 नामांकने मिळाली होती.
जिमी किमेलचा ट्रम्पना टोला
सूत्रसंचालक जिमी किमेल यांनी ट्रम्प यांना टोला लगावला. किमेल म्हणाले, काही माहितीपट महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतात, तर काही फक्त व्हाईट हाऊसमध्ये फिरत बूट ट्राय करण्याबद्दल असतात. ट्रम्प कदाचित रागावतील कारण त्यांच्या पत्नीवर आधारित चित्रपटाला नामांकनच मिळाले नाही.































































