ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना महिन्याभरानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना रुग्णालयातून मंगळवार (17 मार्च) सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या प्रकृतीच्या समस्यांमुळे ९० वर्षीय सलीम खान यांना १७ फेब्रुवारीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात महिनाभर उपचार घेतल्यानंतर सलीम खान सुखरूप घरी परतले आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना मंगळवार, १७ मार्चला मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वृत्तानुसार, एका कौटुंबिक सूत्राने सांगितले की, ते सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरी परतले. मेंदूमध्ये सौम्य रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांची प्रकृती सुधारल्याची डॉक्टरांनी खात्री केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

रुग्णालयात दाखल झाल्यापासून तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम सलीम खान यांच्यावर उपचार करत होती. यापूर्वी, डॉ. पारकर यांनी सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले होते की, त्यांना मेंदूमध्ये सौम्य रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत आहे. त्यांचे वय पाहता, बरे होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार असल्याचे डाॅक्टर म्हणाले.

रुग्णालयात दाखल असताना, सलीम खान यांना त्यांचे अभिनेते पुत्र सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासह कुटुंबातील सदस्य नियमितपणे भेटायला येत होते. सलमानचे इंडस्ट्रीतील मित्र शाहरुख खान आणि आमिर खान हे देखील त्यांना भेटायला आले होते, तर सलीम यांचे जुने मित्र आणि पूर्वीचे पटकथा लेखन भागीदार जावेद अख्तर हे देखील त्यांना भेटायला गेले होते.