
मार्च महिना अखेरच्या पार्श्वभूमीवर महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याचे धक्कादायक चित्र चंद्रपूर शहरात पाहायला मिळत आहे. चालू वीजबिलाची मुदत संपण्यापूर्वीच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे संतप्त झालेल्या एका ग्राहकाने कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चंद्रपुरात महावितरणचा मनमानी कारभार; देयक तारखेपूर्वीच वीज कापल्याने ग्राहकाचा संताप, व्हिडिओ व्हायरलhttps://t.co/35Mdc4iKH1 pic.twitter.com/sACNKiwjt1
— Saamana Online (@SaamanaOnline) March 18, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील रहिवासी प्रवीण रॉय यांच्या घरी वीजबिल भरण्याची अंतिम तारीख अद्याप शिल्लक असतानाही महावितरणचे कर्मचारी वीज कापण्यासाठी पोहोचले. नियमानुसार मुदत संपण्यापूर्वी वीज खंडित करता येत नाही, मात्र ‘मार्च एंडिंग’चे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवीण रॉय यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला. “बिलावर दिलेली तारीख अजून संपली नसताना वीज कापण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल करत त्यांनी कर्मचाऱ्याला खडेबोल सुनावले.



























































