दुबई नको आता दिमापूरला जाऊ! हिंदुस्थानींचा वाढता ओढा देशांतर्गत पर्यटनाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या जगभरात युद्धाचे वारे घोंगावत असल्याने, आता हिंदुस्थानी पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाकडे पसंती दिली आहे. मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर, सुट्टी पडल्यानंतर कुठे जायचे यासाठी आता घरोघरी बेत रंगू लागले आहेत. परंतु सध्याच्या घडीला मध्यपूर्वेकडील युद्धजन्य परिस्थिती पाहता आता हिंदुस्थानातील लोकांचा वाढता ओढा हा देशांतर्गत सहलींकडे वळलेला आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या बुकिंगच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की, आंतरराष्ट्रीय मार्गांबाबतची अनिश्चितता आणि वाढत्या विमान भाड्यांमुळे प्रवासी देशातच फिरण्याला प्रथम पसंती देत आहेत. त्यामुळेच देशांतर्गत प्रवासाकडे लक्षणीय कल वाढताना दिसत आहे.

ठाण्यातील विहंग ट्रॅव्हल्सचे, मकरंद जोशी म्हणाले, होय युद्धामुळे सध्या परदेशी फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यापेक्षा शिमला, मनाली, आसाम, राजस्थान या टूर्स अधिक बुक होऊ लागल्या आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले, सर्वाधिक पसंती ही केरळला मिळालेली आहे.

केवळ इतकेच नाही तर हिंदुस्थानातील ईशान्य भाग पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. शिलाँग, इटानगर, जोरहाट, दिमापूर, इम्फाळ आणि गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये बुकिंगमध्ये मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. त्याचबरोबरीने कोझिकोड आणि लेह यांसारख्या इतर पर्यटन स्थळांनाही मोठी मागणी दिसून येत आहे. उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांनी सुखरुपणे आपल्या देशालाच सर्वाधिक पसंती दिलेली आहे.

विमान कंपन्यांनी आखाती देशांकडे जाणारी बहुतांश विमाने ही संख्येने कमी केली आहेत. त्यामुळेच साहजिकच काही प्रवाशांना हिंदुस्थानातच पर्यायी मार्ग शोधण्यास भाग पडले आहे.
वाढत्या आंतरराष्ट्रीय विमान भाड्यांमुळे ही अनिश्चितता अधिकच वाढत आहे. या वाढीमुळे ऐन हंगामात परदेशापेक्षा आपला देशच बरा असं म्हणण्याची वेळ आता पर्यटकांवर आलेली आहे. त्यामुळेच देशातील पर्यटनस्थळांवर आधारीत उद्योगांसाठी ही बाब दिलाश्याची आहे.