
स्वयंघोषित हवामान तज्ञ दिशाभूल करणारा अंदाज लावत असल्याने, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामागे व्यापाऱ्यांचे कटकारस्थान आहे का याचा शोध घेऊन बोगस हवामान तज्ञवर कडक कारवाई करावी व हवामान अंदाज सांगण्यास बंदी करावी, अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पंढरपूर तहसील कार्यालयावर आज शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कारवाई बाबत तहसीलदारांना निवेदन दिले. बोगस हवामान अंदाजक तीन दिवस पाऊस येणार, गारपीट होणार? असा हवामान अंदाज वर्तवत आहेत. त्यामुळे द्राक्षे, डाळींब, पेरु उत्पादक तोडणीला, उतरणीला आलेला शेतीमाल व्यापाऱ्यांना देण्यासाठी धडपड करतात. याचीच संधी साधून व्यापारी कमी दराने माल खरेदी करतात. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी काढणीला आलेल्या शेतकऱ्यांची देखील धांदल उडत आहे. असे असताना सांगीतल्यानुसार पाऊस येत नसल्याने हवामान वर्तवणारे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक करत असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत हवामान अंदाज वर्तवणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलकांनी केलीने.
पंढरपूर तालुक्यातील द्राक्षे, डाळींब, पेरु, बोर, चिक्कू, उत्पादक शेतकऱ्यांसह गहू, हरभरा, मका, ज्वारी, कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तहसिल कार्यालयावर सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत आंदोलन करण्यात आले. तहसिलदार सचिन लंगुटे यांना चुकीचा हवमाना वर्तवणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी म्हणाले की, सध्या द्राक्षेचा हंगाम सुरु आहे. पेरुचा हंगाम सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळींब, पेरु पिके जोमाने जपली आहे.त त्यांना अपेक्षित दर मिळणे आवश्यक आहे. या फळांना अपेक्षित दर देखील मिळत होता. मात्र, हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांनी येत्या चार दिवसात मुसळधार पडणार, गारपीट होणार आहे, असा अंदाज वर्तवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उतरणीला आलेली द्राक्षे, पेरु व डाळींब विक्री करणे पसंद केले. पर्यायाने व्यापाऱ्यांनी देखील हवामानाचा अंदाज गृहित धरुन शेतकऱ्यांकडून कमी दराने द्राक्षे, डाळींब, पेरु खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तर तूर, हरभरा, कांदा याचेही दर पाडून व्यापारी मागणी करतात. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यास चुकीचा हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डख व इतर कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी काढणीला येणाऱ्या गहू अगोदरच एक ते दोन आठवडे काढणी केली आहे. त्यामुळे अपरिपक्व व हिरवा गहू काढणीत व मळणीत आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत व्यापारी दर पाडून मागणी करत आहेत, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
हवामान अंदाज करणाऱ्या लोकांची चौकशी करा…
पंजाब डख आणि अन्य बोगस हवामान अंदाजक यांची आर्थिक चौकशी करावी. व्यापाऱ्यांशी त्यांचे हितसंबंध आहेत का याची तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन
चुकीचा हवामान अंदाज वर्तवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापारी दर पाडून शेतीमाल खरेदी करत आहेत. तर पाऊस आलाच तर नुकसान होईल, म्हणून या भीतीपोटी शेतकरी शेतीमाल, फळे विक्री करत आहे. केवळ चुकीचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आल्यामूळे हे घडत आहे. त्यामुळे तहसिलदार यांनी दोन दिवसात हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे शेतकऱ्यांना घेवून तीव्र आंदोलन सुरु करणार आहे. – मारुती चव्हाण



























































