
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या इंग्रजी (UNLIKELY PARADISE) आवृत्तीच्या प्रकाशनाची तारीख समोर आली आहे. येत्या २३ मार्च रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मावळणकर हाॅल, काॅन्सिटट्युशन क्लब ऑफ इंडिया, रफि मार्ग, संसद मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, टीमसी खासदार डेरेक ओ ब्रायन, राज्यसभा खासदार जया बच्चन, संजय शर्मा एडिटर इन चिफ 4Pm News हे उपस्थित राहणार असून, या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक चर्चेत असण्याचे एक कारण असे की ‘ईडी’ने संजय राऊत यांना राजकीय दबावाखाली अटक केली होती. त्यांना शंभर दिवसांहून अधिक दिवस तुरुंगात डांबले होते. तुरुंगातील अनुभवांवरील हे पुस्तक इंग्रजी भाषेत असून, UNLIKELY PARADISE या पुस्तकाच्या माध्यमातून सरकार, ईडी, तपास यंत्रणा साऱ्यांचीच पोलखोल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या पुस्तकाची देशभरातील वाचक वाट पाहात आहेत.
‘नरकातला स्वर्ग’ ही कादंबरी नसून, जळजळीत सत्य आहे. यातील प्रत्येक प्रसंग सत्यघटनेवर आधारित आहे. सत्ताधाऱ्यांना धडकी भरेल आणि सर्वसामान्यांच्या डोक्यात विचारचक्र भिरभिरेल असा यातील एकेक प्रसंग आहे. निर्दोषांना गुन्हेगार ठरवण्यासाठी जुलमी सिंहासने कोणत्या थराला जाऊ शकतात, किती हीन पातळी गाठू शकतात याचे थरारक चित्रण संजय राऊत यांच्या लेखणीतून या पुस्तकात उतरले आहे. त्यामुळे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीची देशभरातील वाचकांना उत्कंठा लागून राहिलेली आहे.

























































