महसूल विभागात महाघोटाळा, दोन लाख सातबारा बदलले; सरकारची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारच्या कारभारात दररोज एकसे बढकर एक घोटाळे समोर येत असताना आता महसूल विभागातही महाघोटाळा झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी ‘7/12’ दुरुस्तीसाठी असलेल्या कलम 155चा गैरवापर करीत राज्यभरात तब्बल दोन लाखांवर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच आज विधान परिषदेत घोटाळा झाल्याची कबुली दिली आहे.

अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी प्रकरणाची सविस्तर आकडेवारीच सादर केली. पुण्यात झालेल्या तपासणीमध्ये 38 हजार 27 घोटाळ्यांची प्रकरणे उघड झाली आहेत. यामध्ये महसूल विभागातील 247 अधिकारी दोषी आढळल्याचे ते म्हणाले. पुण्यातील हे प्रकरण पाहता संपूर्ण राज्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण राज्यात अशा प्रकरणांची तपासणी करून पुढील अधिवेशनाआधी ही पूर्ण माहिती जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.

दोन लाख कुटुंबांवर आत्महत्येची वेळ

धनिकांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगरीबांच्या केलेल्या या फसवणुकीमुळे या कुटुंबावर आत्महत्येची वेळ आल्याचे या वेळी आमदार अॅड. अनिल परब म्हणाले. त्यामुळे या दोषी अधिकाऱयांना निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली. या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी आता परराज्यातील लोकांचा समावेश असणारी ‘एसआयटी’ नेमावी लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

असा झाला घोटाळा…

महसूल कायदा कलम 155नुसार ‘7/12’मधील नावातील दुरुस्ती, नोंद फेरफार, शुद्धलेखन, दुरुस्ती करता येते. यानुसार महसूल अधिकाऱ्यांकडे गेलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन परस्पर बिल्डर, धनिकांच्या घशात घालणे, जमिनीची परस्पर मालकी बदलणे, परस्पर हद्द कमी-जास्त करणे, हद्द बदलणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महसूल विभागातील आर्थिक फायदा घेत गोरगरीबांच्या जमिनी धनिक-बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत.

प्रवीण गेडाम समितीच्या अहवालानुसार 15 अधिकाऱ्यांनी अतिगंभीर, 82 अधिकाऱ्यांनी गंभीर तर 55 अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी सात दिवसांत कार्यवाही करू, असे बावनकुळे यांनी जाहीर केले.

शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मुद्दा मांडला. सर्वच विभागांचे घोटाळे बाहेर येत असताना महसूल विभागात झालेला हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे ते म्हणाले.