
रासायनिक सांडपाणी तसेच जनावरांच्या मांसाचे अवशेष विनाप्रक्रिया थेट पाण्यात मिसळत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ होत आहे. नदीकाठच्या जमिनी, विहिरी बाधित होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था, कॉमन मॅन संघटना यांच्याकडून आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त या प्रतीकात्मक अधिकाऱयांना दूषित नाल्यावर बसवून कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत मंजूर झालेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू न झाल्यास सांडपाण्यासह जनावरांचे अवशेष महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात अर्पण करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.
तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी, रासायनिक पाणी, मोठय़ा जनावरांचे रक्तामांसाचे अवशेष प्रक्रिया न करता पंचगंगेत सोडले जात आहेत. त्यामुळे काठावरील शेतजमिनी नापीक होऊन विहिरीही बाधित झाल्या आहेत. तसेच नदीकाठच्या पुलाची शिरोली, गांधीनगर, वळीवडेपासून पुढील सर्व गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभे करण्यास केंद्र शासनाच्या अमृत-2 या योजनेतून महापालिकेला निधी प्राप्त झाला आहे. कामाची वर्कऑर्डरही एका कंपनीला चार वर्षांपूर्वी दिली आहे, पण प्रत्यक्षात आजही काम चालू झालेले नसल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणले.
पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी प्रशासनाचा निषेध म्हणून आज या नाल्याच्या काठावर पुणे विभागीय आयुक्त, कोल्हापूर जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांना खुर्चीवर बसवून घोषणाबाजी केली. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास मातकर हे पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत अधिकारी येणार होते; पण महासभेचे कारण सांगून त्यांनी येण्याचे टाळले.
यावेळी पर्बत पॉल, अथर्व कोंडेकर, सुप्रिया बढे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.





























































