
अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा प्रकार अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत, हे राज्याचं दुर्दैव असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नवीन वर्ष महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आहे. आज ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये, किंबहुना दिल्लीमध्ये सुद्धा जिथे जिथे मराठी माणसं आहेत, ते आपलं मराठी नववर्ष साजरं करतायत, गुढ्या उभारतायत, आनंदात आहेत. हा आनंद आमच्या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये कायम राहावा, याच मी त्यांना शुभेच्छा देतो. अर्थात आज काही राजकीय बोलण्याचा प्रयोजन नाही. शुभेच्छा देताना पण राज्यकर्त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या, खास करून आपल्या मनातील राजकीय कटुता दूर करून सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्र मजबूत करण्याची गुढी आपण कशी उभारू शकतो, स्वाभिमानाची गुढी कशी उभारता येईल, या संदर्भात एकत्र बसून विचार करणं गरजेचं आहे असे संजय राऊत म्हणाले.
अशोक खरात प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील अत्यंत धक्कादायक असा प्रकार काल उघडकीस आला. जे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे मार्गदर्शक आहेत, आध्यात्मिक मार्गदर्शक, नाशिक जिल्ह्यातले, त्यांना काल बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक झालेली हे एक प्रकरण नाही. अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आणि पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे या महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातल्या अनेकांचे पुरावे त्या मुद्देमालामध्ये असल्याचं आता सांगितलं जातंय.
तसेच महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही मंजूर केला. असं असताना सुद्धा शासनातल्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्ती, मग महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे अंधश्रद्धा कुरवाळत आहेत. त्या बाबाचं कोणी पाद्यपूजन करतायत, कोणी त्यांचे पाय धुतायत, कोणी त्यांच्या पायाचं तीर्थप्राशन करतायत, कोणी त्यांच्याबरोबर पूजेला बसलाय, कोणी जादूटोणा करतंय. खरं म्हणजे ज्यांची छायाचित्रं आलेली आहेत, त्यांच्याबरोबर पाद्यपूजेपासून ते पूजेला बसण्यापर्यंत किंवा इतर विधी करताना दिसत आहेत, त्या सगळ्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय? की महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं. पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असतील, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात? देवेंद्र फडणवीसांना थोडी जरी नैतिक चाड असेल आणि कायद्याची चाड असेल, तर ज्या कुणा मंत्र्यांचे आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींचे संबंध तिथे उघड होत आहेत, आधी त्यांना पदावरून दूर करावं, चौकशी समिती नेमावी. आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सत्तेपासून दूर ठेवावं. त्या भोंदू बाबाला वाचवण्यासाठी सरकारमधले अनेक लोक प्रयत्न करतायत. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना ताबडतोब पायउतार केलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महाराष्ट्र आपण शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे अशा महान पुरोगामी व्यक्तिमत्त्वांची नावं घेतो. महाराष्ट्र हा कायम ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध लढणारा महाराष्ट्र आहे. देशातलं हे पहिलं राज्य ज्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला. पण तुमच्या राज्याचे मंत्रीच सत्तेत टिकण्यासाठी, आपली पापं झाकण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून दबावाचं राजकारण करणार असतील, तर मला वाटतं की हे गृह मंत्रालयाचं काम आहे की संबंधित आणि स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ताबडतोब अशा लोकांना बडतर्फ केलं पाहिजे.
या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत. त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवतंय, हे आता मला फार कोडं पडलेलं आहे.
आज पाडव्यासारखा दिवस आहे, मराठी नववर्ष आहे, शुभ दिवस आहे. आणि संबंधित ज्याला अटक झाली आहे, त्या भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं. त्या सर्व मराठी महिला आहेत, अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थप्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. हे अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणं कृत्य महाराष्ट्रात घडत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत, हे राज्याचं दुर्दैव आहे.
रुपाली चाकणकर मूर्ख आहेत आणि खोटं बोलतायत. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी या पदावर मिनिटभर राहू नये. यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न कुठे येतोय? यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या. शेवटी एका महिलेन असह्य होऊन नाशिकमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे. बंद दाराआड महिलांचे हुंदके ऐकायला येत होते, असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत.
मी नेहमीच म्हणतोय, महाराष्ट्राला जेव्हा आपण पुरोगामी राज्य म्हणतो, त्याच कारण आम्ही ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध कायम लढे दिले. पण दुर्दैवाने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये देशात आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा महापूर आलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, त्यांना पदावरून दूर करावं. जे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातले तिथे जाऊन विधी करत होते, ते विधी कोणते होते, कोणासाठी करत होते, त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचं होतं, या संदर्भातली माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून घ्यावी. तुम्हाला अत्यंत धक्कादायक माहिती मिळेल. महाराष्ट्रातल्याच आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध अघोरी काम करण्यासाठी काही मंत्री तिथे जात होते.
राहुल गांधींनी फिडेल कॅस्ट्रोची जी गोष्ट सांगितलेली आहे, सध्या जे पक्ष सोडतायत, त्या पक्ष सोडणाऱ्यांची कथा त्यांनी सांगितलेली आहे. हे सगळ्यांनाच लागू आहे. हे शिवसेनेलाही लागू आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही लागू आहे. जिथे जिथे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह पक्ष फोडण्याचं काम करतायत, लोकांचे कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडतायत, त्यांनी ती गोष्ट ऐकायला हवी. कारण शेवटी जे आमच्याबरोबर राहतात, तेच आमचे लढवय्ये शिलेदार आहेत. जे पळून जातात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.
आतापर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे गेल्या वर्षभरामध्ये 25 काय, 100 वेळा दिल्लीमध्ये आले. प्रत्येक वेळा आले की ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा होते. एक दिवस त्यांचं ‘ऑपरेशन अमित शाह’ करतील. यांना भारतीय जनता पक्ष अद्याप कळलेला नाही. काय आहे तो? भारतीय जनता पक्ष समजून घ्यायला त्यांना फार वेळ लागेल. आम्ही फार खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे.
हा 4000 एकर जमिनीचा विषय अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे सुद्धा हा विषय आलेला होता. त्या दरम्यान विधिमंडळामध्ये विजय वडेट्टीवार यांनी त्या विषयाला आवाज दिला. आता खासदार निलेश लंके त्यावर बोलतायत. सरकारी जमिनी मंत्री आणि त्यांचे नातेवाईक हजारो एकर हेक्टर कशा प्रकारे लुबाडतायत, याचं हे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेसकडे किमान नीतिमत्ता होती. पण भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये चोर, दरोडेखोर, लफंगे, भ्रष्टाचारी यांना प्रतिष्ठा दिली जाते. त्याच्यामुळे जमिनी लुटल्या जात आहेत. कोणाला काही पडलेलं नाही असेही संजय राऊत म्हणाले.
ग्रामीण भागात गारपीट आहे, अवकाळी पाऊस आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता हे जे बाबा-महाराज वगैरे आहेत, ज्यांच्याकडे हे मंत्री जात होते, त्यांचं कर्तव्य आहे की आता या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी सुद्धा एखादा यज्ञ करावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.



























































