
सध्या भारताचे राज्यकर्ते सदैव निवडणूक प्रचारात गुंतले आहेत, तर पाकिस्तान परमाणू कार्यक्रम वाढवत आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी हा परमाणू कार्यक्रम उद्या कृतीत आणला जाईल. कधीकाळी अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानची आता अमेरिकेला भीती वाटत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी चिंता करावी असा हा प्रकार आहे. भारताने आता स्वतःच्या मिसाईल डिफेन्स (S-400, BMD) आणि Nuclear trial ला अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. जागतिक नेत्यांना फक्त मिठ्या मारून देश मजबूत होत नसतो. शांतता व सुरक्षा हवी असेल तर देश परमाणू शक्ती आणि शस्त्रबलात मजबूत करावा लागतो. नाहीतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अर्धवट सोडावे लागते.
इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिकेसाठी आणि इस्रायलसाठी धोकादायक ठरू शकेल असे वाटल्याने दोन्ही राष्ट्रांनी इराणवर हल्ले केले. युद्ध अद्यापि संपलेले नाही. संपण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. एखाद्या राष्ट्रात परमाणू शस्त्र, क्षेपणास्त्रे बनविण्याचा कार्यक्रम सुरू असेल तर तो दुसऱ्या राष्ट्रांवर हल्ला करण्यासाठीच असतो असे नाही. आपले राष्ट्र संरक्षणसिद्ध होण्यासाठी असे परमाणू कार्यक्रम सुरू असतात, पण कोणी काय करायचे किंवा नाही हे ठरविण्याची फौजदारी अमेरिकेने स्वीकारली आहे व इस्रायलसारखी राष्ट्रे अमेरिकेला त्या कामी सहकार्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी खतरनाक माहिती बॉम्बसारखी फुटली आहे. तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संघटनेच्या संचालिका आहेत. काल त्यांनी पाकिस्तान व चीन यांची हातमिळवणी अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगाने वाढवत आहे. चीनच्या पाठिंब्यावर सुरू असलेला कार्यक्रम अमेरिकेच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला धोकादायक ठरेल हे तुलसी गबार्ड यांनी सिनेट पॅनलसमोर जाहीर केले. तुलसीबाईंनी जे सांगितले ते भारतीय परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाने कान साफ करून ऐकायला हवे. कारण पाकिस्तान जर त्याचा परमाणू कार्यक्रम राबवत असेल तर भारताच्या अस्तित्वाला सगळ्यात जास्त धोका आहे. 2035 पर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या घरात घुसू शकतील. पाकिस्तानच्या वाढत्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमामुळे अमेरिकेच्या भूमीवर थेट हल्ला होऊ शकतो, असे तुलसी गबार्ड म्हणतात. पाकिस्तानचा परमाणू कार्यक्रम हा नेहमी भारतासाठी धोकादायक मानला जातो, पण आता तो
अमेरिकेसाठीही धोकादायक
बनत असल्याचे त्यांच्या स्वतःच्याच गुप्तचर यंत्रणेचे मूल्यांकन व निरीक्षण आहे. तुलसी गबार्ड यांचे हे निवेदन सगळ्यात आधी भारताने गांभीर्याने घेतले पाहिजे. ईव्हीएमवरील मतदान पद्धतीने घोटाळेच घोटाळे होऊ शकतात असे आंतरराष्ट्रीय मंचावर बोलणाऱ्या याच तुलसी गबार्ड आहेत व भारतात ‘ईव्हीएम’ घोटाळ्यातून भाजपची सरकारे सतत बनत आहेत. तुलसी या वास्तवास धरून बोलतात. तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या तत्कालीन काँगेस सदस्या आणि 2020 च्या ‘डेमोव्रॅटिक प्रेसिडेन्शियल’ उमेदवार होत्या. 2024 च्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना राष्ट्रीय गुप्तचर संचालक (Director of National Intelligence – DNI) म्हणून नियुक्त करण्यात आले. पूर्वी त्या ‘No war with Iran’ च्या समर्थक होत्या. आता त्यांनी भूमिका बदलून इराणपासून अमेरिकेला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आता सांगितले की, अमेरिकेचा सुरक्षित परमाणू प्रतिरोध (Nuclear deterrent) देशाच्या सुरक्षेसाठी समर्थ व पुरेसा आहे, पण रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे देश नॉव्हल, अॅडव्हान्स्ड किंवा पारंपरिक मिसाईल डिलिव्हरी सिस्टम विकसित करत आहेत, ज्यात परमाणू हत्यारे व क्षेपणास्त्रे असू शकतात. ही धोकादायक मिसाईल्स आमच्या मातृभूमीपर्यंत पोहोचू शकतात. गबार्ड यांच्या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा भाग असा की, पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईल विकासात ICBM (Intercontinental Ballistic Missile) चा समावेश नक्कीच असू शकतो, ज्यांचा पल्ला अमेरिकेच्या भूमीपर्यंत पोहोचू शकतो.
पाकिस्तानकडे सध्या
शाहीन -3 आणि अबाबील यांसारखी मिसाईल आहेत, ज्यांचा पल्ला 2750 किलोमीटरपर्यंत आहे, पण आता तो ICBM विकसित झाल्यावर साधारण सहा हजार किलोमीटरपर्यंत जाण्याच्या दिशेने आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे की, 2035 पर्यंत ज्या पाच देशांकडील मिसाईल्सची संख्या तीन हजारांवरून 16 हजारांपेक्षा जास्त होणार आहे, त्यात पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तान जो एकेकाळी अमेरिकेचा स्ट्रटेजिक पार्टनर होता तो आता परमाणू धोक्याच्या यादीत सामील झाला आहे. अशा वेळी भारत नेमका कोठे आहे? पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत असताना तो परमाणू आणि मिसाईल कार्यक्रमावर जास्त खर्च करीत आहे. हे आर्थिक व तांत्रिक बळ भारताला दुर्लक्षित करता येणार नाही. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अमेरिकेच्या दबावामुळे अर्धवट सोडावे लागले व प्रे. ट्रम्प यांनी पाकिस्तानी जनरल्सचे काैतुक करून त्यांना ‘व्हाईट हाऊस’मध्ये सन्मानाने डिनरला बोलावले. सध्या भारताचे राज्यकर्ते सदैव निवडणूक प्रचारात गुंतले आहेत, तर पाकिस्तान परमाणू कार्यक्रम वाढवत आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी हा परमाणू कार्यक्रम उद्या कृतीत आणला जाईल. कधीकाळी अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानची आता अमेरिकेला भीती वाटत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी चिंता करावी असा हा प्रकार आहे. भारताने आता स्वतःच्या मिसाईल डिफेन्स (S-400, BMD) आणि Nuclear trial ला अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. जागतिक नेत्यांना फक्त मिठ्या मारून देश मजबूत होत नसतो. शांतता व सुरक्षा हवी असेल तर देश परमाणू शक्ती आणि शस्त्रबलात मजबूत करावा लागतो. नाहीतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अर्धवट सोडावे लागते.






























































