
राज्यसभेतील खासदारांपैकी 36 खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. याशिवाय 31 खासदार अब्जाधीश आहेत. गंभीर गुन्हे असलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक 27 खासदार भाजपचे आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) राज्यसभेतील 229 खासदारांसंदर्भात एक अहवाल जारी केला. त्यात नुकत्याच निवड झालेल्या 37 खासदारांचीदेखील माहिती आहे.
राज्यसभेत एकूण 245 सदस्य असतात. त्यापैकी 229 खासदारांबाबत त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्राच्या आधारे एडीआरने हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, 73 खासदारांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. यापैकी 36 खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका खासदाराविरोधात हत्येचा, 4 खासदारांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा तसेच 3 खासदारांवर महिलांविरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. भाजपचे सर्वाधिक 27, काँग्रेसचे 12, तृणमूल आणि ‘आप’चे प्रत्येकी 4 तसेच माकप आणि बीआरएसच्या प्रत्येकी 3 खासदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
कोणाकडे सर्वाधिक संपत्ती?
तेलंगणातील बीआरएसचे खासदार बंदी पार्थ सराधी यांच्याकडे 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्याखालोखाल ‘आप’चे राजेंद्र गुप्ता यांच्याकडे 5,053 आणि वायएसआरसीपीचे अयोध्या रामी रेड्डी यांच्याकडे 2,577 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
भाजपकडे सर्वाधिक अब्जाधीश खासदार
31 खासदारांकडे 1 अब्ज रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. त्यात भाजपचे 6, काँग्रेसचे 5, वायएसआरसीपीचे 4, आप आणि बीआरएसचे प्रत्येकी 2 तसेच अजित पवार गटाच्या 2 खासदारांकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.




























































