महापालिकेच्या कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण, शिवसेनेच्या मागणीला यश, महासभेत ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व लोकाभिमुख व्हावा यासाठी शिवसेनेने केलेल्या या मागणीला आता यश आले असून महासभेत ठराव मंजूर झाला आहे.

बृहन्मुंबई महापालिका ही जगातील सर्वात मोठी महापालिका आहे. सध्या पालिकेच्या सभागृहात चालणारे कामकाज जनतेपर्यंत थेट पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक पालिकेच्या सभागृहात जनतेचे विविध प्रश्न मांडत असतात. मुंबईतील वेगवेगळ्या विषयांवर, समस्यांवर चर्चा करतात, परंतु पालिकेचे कामकाज कशाप्रकारे चालते, लोकप्रतिनिधी आपल्या समस्या कशाप्रकारे मांडतात हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही. त्यामुळेच ही मागणी करण्यात आली होती.

विधानसभा आणि लोकसभेच्या धर्तीवर पालिकेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी 25 फेब्रुवारी रोजी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून 17 मार्च रोजी झालेल्या महासभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे पालिकेचे कामकाज आता सर्वसामान्य जनतेला लाईव्ह बघता येणार आहे.