
आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्रेंचायझीने अद्याप त्याच्या जागी पर्याय जाहीर केलेला नसल्याने संघाच्या रणनितीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एलिस हा डेथ ओव्हर्समधील सीएसकेचा मुख्य अस्त्र मानला जात होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे शेवटच्या षटकांतील गोलंदाजी कमकुवत होण्याची भीती आहे. आता मॅनेजमेंट पर्याय शोधण्यात व्यस्त असून मॅट हेन्रीला अंतिम संघात नियमित संधी मिळण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
एलिसचा टी-20 कारकीर्दीतील विक्रम प्रभावी आहे. 180 पेक्षा अधिक सामन्यांत 200 पेक्षा अधिक विकेट्स, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही 50 हून अधिक विकेट घेणाऱया या गोलंदाजाची उणीव सीएसकेला नक्कीच जाणवणार.
पर्याय आहेत, पण खात्री नाही
सीएसकेकडे खलील अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग यांसारखे वेगवान पर्याय आहेत. शिवम दुबे, जेमी ओव्हरटन यांच्यासारखे अष्टपैलूही गोलंदाजी करू शकतात, मात्र एलिससारखी डेथ ओव्हर्समधील धार कोण आणणार, हा मोठा प्रश्न आहे.


























































