
पश्चिम आशियातील संघर्षाला नवे वळण मिळाले असून इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी येथील LNG प्लांटवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात प्लांटमध्ये भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जागतिक ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.
कतार एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी सांगितले की, सध्या प्लांट केवळ 17 टक्के क्षमतेने कार्यरत आहे आणि पूर्णपणे दुरुस्त होण्यासाठी 3 ते 5 वर्षे लागू शकतात. या हल्ल्यामुळे सर्वात मोठा फटका हीलियम उत्पादनाला बसला असून कतार हा जगातील सुमारे 33 टक्के हीलियम पुरवठा करणारा देश होता. एका रात्रीत जगातील एक तृतीयांश हीलियम पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हीलियम ही अतिशय हलका आणि थंड वायू असून सेमीकंडक्टर (चिप) उद्योग, MRI मशीन, रॉकेट इंधन तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या वायूचा स्वस्त पर्याय उपलब्ध नसल्याने पुरवठा खंडित होताच दर दुपटीने वाढले असून अनेक देशांमध्ये संकट निर्माण झाले आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम जगातील 12 प्रमुख देशांवर झाला आहे. दक्षिण कोरिया हा कतारकडून 64.7 टक्के हीलियम आयात करतो. त्यामुळे सॅमसंग आणि एसके हायनिक्ससारख्या कंपन्यांच्या चिप उत्पादनावर धोका निर्माण झाला आहे. तैवानमधील TSMC ही कंपनी जगातील सुमारे 18 टक्के चिप तयार करते. कंपनीकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी चिंता व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये चिप उत्पादन आणि MRI मशीन निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून कतारचा पुरवठा 60 दिवसांपेक्षा जास्त काळ खंडित राहिल्यास उत्पादन थांबण्याची शक्यता आहे. सिंगापूर हा सेमीकंडक्टर हब असल्याने तेथेही परिणाम दिसून येत आहेत.
हिंदुस्थानात रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या MRI मशीनसाठी हीलियमचा पुरवठा कतारकडून होतो. त्यामुळे स्कॅनचे दर वाढण्याची शक्यता आहे. जर्मनीत Linde आणि Air Liquide सारख्या कंपन्या हीलियम पुरवतात. मात्र दर 100 टक्क्यांनी वाढले असून आता हीलियमचे राशनिंग सुरू करण्यात आले आहे.
अमेरिकेतही हीलियमचा साठा कमी होत असून HP, Dell आणि Lenovo सारख्या कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये NHS रुग्णालयांतील MRI सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे, कारण तिथे हीलियम उत्पादन होत नाही. फ्रान्समध्ये Air Liquide असला तरी नवीन हीलियम उत्पादन शक्य नाही.
चीन हा चिप आणि MRI साठी हीलियम आयात करणारा देश असून आता तो सायबेरियात नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलिया काही प्रमाणात निर्यातदार असला तरी कतारच्या कमतरतेची भरपाई करू शकत नाही.
कतारने स्पष्ट केले आहे की प्लांटची दुरुस्ती करण्यास किमान 5 वर्षे लागू शकतात आणि तातडीने नवीन उत्पादन सुरू करणे शक्य नाही. चिप निर्मिती कंपन्यांकडे आधीच मर्यादित साठा असल्याने हे संकट 2 ते 3 महिने कायम राहिल्यास स्मार्टफोन, लॅपटॉप, AI चिप्स, वाहन उद्योग आणि MRI सेवा यावर मोठा परिणाम होणार आहे.
या घटनेमुळे जागतिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उद्योग अक्षरशः अडचणीत सापडले असून मध्य पूर्वेतील एका हल्ल्याने संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.





























































