
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर जागितक शेअर बाजारासह हिंदुस्थानी बाजारही दबावाखाली आहेत. त्यामुळे बाजार ऑल टाईमहायवरून सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत. बुधवारी शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसली होती. त्यानंतर गुरुवारी मोठी घसरण झाली. शुक्रवारी बाजार सावरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजार सावरणार की मोठी घसरण होणार, या संभ्रमात गुंतवणूकदार आहेत.
शुक्रवारी बाजार लाल रंगातून हिरव्या रंगात आले. शेअर बाजाराने तेजीने जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला. तर निफ्टीतही 300 अंकांची वाढ दिसून आली. दुपारच्या सत्रात थोडी घसरण झाली अशली तरी बाजार अजूनही हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी शेअर बाजार तेजीत सुरू झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन्ही हिरव्या रंगात उघडले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स जवळपास १००० अंकांनी वधारला, तर निफ्टी ५० मध्येही ३०० हून अधिक अंकांची वाढ झाली.
सकाळी सेन्सेक्स ७४,५५९.३८ अंकांवर आणि निफ्टी २३,११०.१५ अंकांवर तेजीने उघडला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी आणखी वाढ नोंदवली. सकाळी ९:४० वाजता, सेन्सेक्स ८६२ अंकांनी वाढून सुमारे ७५,०६९ अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी ५० देखील २५६ अंकांनी वाढून २३,२५८ अंकांवर पोहोचला. बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांना अंदाजे ६ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 527.95 अंकांच्या म्हणजे 0.71 % वाढीसह 74,733.89 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 171.45 अंकांच्या म्हणजे 0.75% वाढीसह 23,214 . 45 वर व्यवहार करत होता. इराणच्या तेल आणि नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांवर यापुढे कोणतेही हल्ले होणार नाहीत, या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या संकेतामुळे बाजारातील भीती कमी झाली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आणि बाजारात तेजी आली, असे तज्ज्ञांनी सांगितले.
तणाव कमी होत असल्याच्या वृत्तांमुळे ब्रेंट क्रूडच्या किमतींना लक्षणीय दिलासा मिळाला आहे. तेलाची किंमत कालच्या ११८ डॉलर प्रति बॅरलच्या उच्चांकावरून १०६ डॉलरवर घसरली आहे. सागरी मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी युरोप आणि जपानकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेही किमती खाली आणण्यास मदत झाली आहे. शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली, तर गुरुवारी अमेरिकन बाजारांमध्ये घसरण झाली. टेस्ला आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समधील घसरणीमुळे वॉल स्ट्रीट दबावाखाली राहिले.
गुरुवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली, ज्यात गुंतवणूकदारांचे अंदाजे १२ लाख कोटींचे नुकसान झाले. परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) ७,५५८ कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ३,८६४ कोटींची खरेदी करून बाजाराला काहीसा आधार दिला.मात्र, आगामी काळात बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.



























































