रायगड झेडपीच्या अध्यक्षांनी फोडला अर्थसंकल्पाचा प्राथमिक आराखडा; सदस्य नसलेले भाजप-शिंदे गट-अजित पवार गटाचे पदाधिकारीही बैठकीत उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २७ मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अर्थसंकल्पाचा प्राथमिक आराखडा फोडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अधिकृत सदस्य नसलेले भाजप-शिंदे गट तसेच अजित पवार गटाचे काही पदाधिकारीही संबंधित बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींची चर्चा झाल्याने गोपनीयतेचा भंग झाला असल्याची टीका जिल्हा परिषदेमध्ये होत आहे.

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी झेडपीच्या अध्यक्षांनी सर्वपक्षीय सदस्यांना बोलावणे संयुक्तिक होते, पण या बैठकीला जिल्हा परिषदेचे अधिकृत सदस्य नसलेले भाजपचे चित्रा पाटील, आस्वाद पाटील व सतीश धारप हे पदाधिकारीदेखील हजर होते. त्याशिवाय अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे गटाच्या नेत्या मानसी दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावण्यात आले. या बैठकीमध्ये भाजपचे झेडपी अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अर्थसंकल्पातील अनेक बाबी उघड केल्याचे दिसून आले. त्यांनी अर्थसंकल्प फोडल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.