
उत्तर प्रदेशमधील अलिगढ एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. त्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी तिच्याकडे तेथील पोलीस अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. ”तक्रार नोंदवायची असेल तर शैय्यासोबत करावी लागेल’, असे त्या पोलिसाने तरुणीला सांगितले. या प्रकरणी तरुणीने वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या पोलिसाला निलंबीत करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही मुस्लिम समाजाची आहे. बलात्कार प्रकरणाची तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात चकरा मारत होती. या प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर मदतीच्या बहाण्याने आरोपी पोलीस अधिकारी पीडितेच्या संपर्कात होता. मात्र, आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करत पीडितेवर दबाब टाकण्यास सुरुवात केली आणि मदतीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. हे सर्व ऐकून ती पीडिता हादरली.
यानंतर पीडितने अलिगढच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार केली. तिने पुराव्यादाखल काही चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स देखील पोलिसांकडे सादर केले आहेत. अलिगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित (Suspend) केले.























































