
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स २०२६ च्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळून मुंबई आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी संघाने ‘द मिक्स’ नावाचा एक खास बॉन्डिंग प्रोग्राम आयोजित केला होता. या कार्यक्रमात माजी कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंसोबत धम्माल मस्ती तर केलीच, पण चाहत्यांना एक मोठे आश्वासनही दिले. “तुमच्यासाठी सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी आमचा संघ सर्वस्व पणाला लावेल,” असा शब्द रोहितने यावेळी दिला.
मुंबई इंडियन्ससाठी गेल्या पाच वर्षांचा प्रवास खडतर राहिला आहे. २०२० मध्ये पाचवे विजेतेपद पटकावल्यानंतर संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये संघ गुणतालिकेत तळाला होता, तर गेल्या हंगामातही संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र, गेल्या वेळी संघाने जोरदार पुनरागमन करत प्लेऑफमध्ये धडक मारली होती, पण अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात ते अपयशी ठरले. यावर्षी हे अपयश धुवून काढण्याचा निर्धार संघाने केला आहे.
अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. संघाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची तगडी फलंदाजी. रोहित शर्मासोबतच संघात तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांसारखे स्टार आहेत. तसेच रेयान रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांच्या समावेशामुळे संघाची फळी अधिक मजबूत झाली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या या मिश्रणामुळे मुंबईचा संघ कागदावर अत्यंत संतुलित आणि धोकादायक दिसत आहे.

























































