
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. ११ जोशी पाळंद येथे नगरपरिषदेच्या बगीच्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याच बगीच्याच्या बाजूला साई मंदिरही आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली साई मंदिर हटविण्याचा घाट घातला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रथम टप्प्यात या बगीचा परिसराचे सुशोभीकरण करावे आणि गरज वाटल्यास शेवटच्या टप्प्यात साई मंदिराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांच्यासह परिसरातील साईभक्तांनी केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसाद सावंत युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायंगणकर उपस्थित होते.
नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ११ जोशी पाळंद येथे नगरपरिषदेचा बगीचा असून त्याला लागून अनेक वर्षांपूर्वी लोकांनी तिथे साईबाबाचे मंदिर उभारले आहे. दर दिवशी या परिसरातील अनेक लोक नियमित साईबाबांची पूजा अर्चा करतात. संध्याकाळी दररोज येथे साईबाबांची आरती होते. या मंदिरामुळे या परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. शासनाच्या योजेनेनुसार या गार्डनचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. खरं तर प्रभागातील लोकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु सुशोभीकरण करताना मंदिर वगळून बाकीचा गार्डनच्या परिसराचे आधी सुशोभीकरण करावे आणी गरज वाटल्यास शेवटच्या टप्प्यात मंदिराचे सुशोभीकरण करावे असे आमचे म्हणणे आहे. या विषयात लक्ष घालून लोकांच्या भावनेच्या मागे उभे राहावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी तुकाराम कारकर, प्रसाद रायंगणकर, पारस खानविलकर, स्वप्नील साखरकर, राज खानविलकर, गणेश वाडेकर, कैलास खानविलकर, अमित इंगवले, ज्ञानेश खानविलकर, सौ. अभिज्ञा इंगवले, सौ. ईशा रायंगणकर, कमलेश वाईकर, रूपेश वाघधरे आदी परिसरातील साईभक्त उपस्थित होते. साई मंदिराला जराही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन प्रसाद सावंत यांनी उपस्थित साई भक्तांना दिले.



























































