
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली आहे. त्या संदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहांना दिलेल्या नोटिशीमध्ये विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘ज्ञानेश कुमार हे सरकारच्या इशाऱयावर काम करतात,’ असा प्रमुख आरोप विरोधकांनी केला आहे.
देशातील विविध निवडणुकांमध्ये झालेली मतचोरी आणि विविध राज्यांत होत असलेल्या मतदार फेरतपासणी प्रक्रियेत (एसआयआर) ज्ञानेश कुमार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरच विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विरोधकांच्या नोटिशीची सभागृहाने नोंद न घेतल्यास सत्ताधारी आणि निवडणूक आयुक्तांमधील संगनमतावर शिक्कामोर्तब होईल, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्तांवरचे आक्षेप
– मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून झालेली नियुक्ती
– राहुल गांधी यांना लक्ष्य करणारी ‘पक्षपाती’ पत्रकार परिषद
– विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांशी भेदभाव
– तपासांमध्ये अडथळा आणणे
– पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक उपायांस नकार
– सत्ताधारी पक्षाना सुसंगत राजकीय भूमिका
– एसआयआरच्या माध्यमातून लाखो मतदारांना हक्कापासून वंचित ठेवणे



























































