‘एआय’ने न्यायदानात हस्तक्षेप करू नये, सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) न्यायिक प्रणालीमध्ये अशा प्रकारे समाविष्ट केले पाहिजे, जेणेकरून ते आपल्या व्यवस्थेला बळकट करेल. एआयने मोठय़ा प्रमाणात डेटा आणि रेकॉर्ड हाताळण्यास, पॅटर्न ओळखण्यास आणि प्रणालीतील विलंब कमी करण्यास मदत केली पाहिजे. पण त्याने न्याय देण्याच्या कामात हस्तक्षेप करू नये. निर्णय मानवाच्या हातातच राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.

बंगळुरू येथे झालेल्या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या  राष्ट्रीय संमेलन-2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्य कांत सहभागी झाले होते. यावेळी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स-विवादांचे प्रतिबंध आणि निराकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या उद्घाटन सत्रानंतर ते बोलत होते.

 निर्णय देताना न्यायाधीशांनी त्यांच्या तर्कशक्तीवर, अनुभवावर आणि विश्लेषण करण्याच्या क्षमतेवरच अवलंबून राहिले पाहिजे. एआयने केवळ एक साधन म्हणून काम केले पाहिजे, तर दिशा नेहमी मानवी बुद्धीनेच निश्चित केली पाहिजे, असे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले.