
ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आली आहे. या घटनेने पालकवर्ग धास्तावला आहे. कासारवडवली वर्तकनगर, कापूरबावडी आणि मुंब्रा परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोकाळी आझादनगर परिसरात राहणारी ११ वर्षे ६ महिन्यांची अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मार्च रोजी घडली. १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेली. शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरायला जाते म्हणून सांगितले आणि… तिसऱ्या घटनेत पोखरण रोड नं. १ भीमनगर साबळे चाळ येथे राहणारी १६ वर्षीय मुलगी घरातून कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती घरी परतलीच नाही. तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौथी घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मैत्रिणीसोबत फिरण्यास जाते असे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतरही ती आढळून आली नाही. अखेर पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


























































