
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून भाजपला चांगलेच फटकारले आहे. तसेच आखाती युद्धामुळे धोकादायक परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची भऊमिका स्पष्ट केलेली नाही, ते नेमके कोणाला घाबरत आहेत? कोणाच्या दबावामुळे ते गप्प आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
ऑपरेशन तुतारीपेक्षा भाजपने आता खरातच्या ऑपरेशन मुतारीकडे लक्ष द्यावे. ते त्यांच्यासाठी आणि राज्यासाठी महत्त्वाचे आहे. या ऑपरेशनमुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यात राजकारण किती अघोरीपणे केले जात आहे, हे उघड होते. राज्य हे जादूटोण्याची राजधानी करत ते विकास करणार का? असा सवालही त्यांनी केला.
आखाती युद्ध महत्त्वाच्या धोकादायक टप्प्यावर आले आहे. हे युद्ध आता मिनी वर्ल्ड वॉरमध्ये रुपांतरीत झाले आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत या युद्धावर आपली भूमिका मांडू शकले नाही. त्यांनी नेमकी कसली भीती वाटत आहे. पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यानंतरच हे युद्ध सुरू झाले. मोदी यांनी प्रेसिंडट ट्रम्प यांच्याशी गुलामगिरीचा करार केला आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
आता पंतप्रधानांनी हे युद्ध आणि त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. जर ते स्वतःची भूमिका जाहीर करू शकत नसतील तर उच्चस्तरीय बैठका घेण्याला काहीही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही खासदार नाराज असतील तर ते शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर नाराज नाही. तर मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांची नाराजी आहे. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना एक रुपयाचाही निधी देत नाही. त्यामुळे मतदारसंघात कामे करता येत नाही. तर सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार यांना कोट्यवधीचा निधी देण्यात येतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खासदारांची कोंडी होते, तो विषय कालच्या बैठकीत मांडण्यात आला. आज माननीय उद्धव ठाकरे आणि काही आमदारांचा निरोप समारंभ आहे. त्यानंतर निवडणुका होतील. महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार किती जागा मिळतील, त्याचा आढावा घेत पुढील निर्णय घेण्यात येतील, असे ते म्हणाले.
























































