
भुयारी मेट्रो मार्गिकेवर सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाड उद्भवला आणि या मार्गिकेवरील संपूर्ण सेवा जवळपास 20 मिनिटे ठप्प झाली. आरे जेव्हीएलआर आणि कफ परेड अशा दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक बंद राहिली होती. ऐन ‘पीक अवर्स’ला शेकडो प्रवासी विविध स्थानकांत थांबलेल्या मेट्रोमध्ये खोळंबले होते. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ट्रेन जागेवरून हलल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत विस्तार असलेल्या मेट्रो-3ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊन सहा महिने उलटले, मात्र अद्याप या मार्गिकेवर मूलभूत सुविधांची बोंब आहे. मोबाईल नेटवर्क नसणे, तोकडी सुरक्षा, वैद्यकीय सुविधांची वानवा आदी प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत धाकधूक कायम आहे. अशा स्थितीत सोमवारी सकाळी मुंबईकरांच्या कार्यालय गाठण्याच्या वेळेत भुयारी मेट्रो मार्गिकेवर तांत्रिक बिघाड उद्भवला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीजवळ मेट्रोच्या एका डब्यात तांत्रिक बिघाड झाला होता. सकाळी 8.40 ते 9 च्या सुमारास मेट्रोचे दरवाजे बराचवेळ उघडेच राहिले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान तांत्रिक बिघाडाची उद्घोषणा करण्यात आली. तांत्रिक बिघाड दुरुस्त करेपर्यंत दोन्ही दिशेने होणारी वाहतूक ठप्प राहिली. विविध स्थानकांत ट्रेन उभ्या राहिल्याने प्रवाशांचा ऐन ‘पीक अवर्स’ला खोळंबा झाला. भुयारी मेट्रो मार्गिकेवर यापूर्वीही तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मेट्रो सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
मेट्रो प्रशासनाचे म्हणणे
नियमित प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मेट्रोची सेवा जवळपास 20 मिनिटे ठप्प झाली होती. मात्र, मेट्रो प्रशासनाने 10 मिनिटांत बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्वपदावर आणल्याचा दावा केला. आरे जेव्हीएलआर ते सिद्धिविनायक स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सेवा काही काळ बंद होती. एक गाडी थांबली की त्याचा परिणाम मागील सर्व गाडय़ांच्या वेळेवर होतो. त्यामुळे विविध स्थानकांतील प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी वेगवेगळा असू शकतो, असे स्पष्टीकरण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱयांनी दिली.



























































