
दिवेआगर समुद्रात पुण्याच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. रमेश धिंडले असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने रमेशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे धिंडले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील हवेली येथे राहणारा रमेश धिंडले हा मित्रांसह दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. ते सर्व जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. एका मोठ्या लाटेच्या प्रवाहाबरोबर रमेश खोल समुद्रात गेला. त्यानंतर पुन्हा तो दिसलाच नाही. मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर त्याचा भाऊ रोहन आणि मित्रांनी दिघी सागरी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सुरू केली. भरडखोल येथील म्हात्रे फार्म हाऊसजवळ समुद्रकिनाऱ्यावर रमेश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


























































