
ओडिशामध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ५५ लाख रुपयांचे बक्षीस आणि दीर्घकाळ पोलिसांच्या वाँटेड यादीत असलेला माओवादी सुकरू उर्फ कोशा सोढी याने अखेर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या चार साथीदारांसह आणि एक AK-47 रायफलसह कंधमाल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुकरू हा बंदी घातलेल्या CPI (माओवादी) संघटनेच्या राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य होता. तो अनेक वर्षांपासून सक्रिय असून कंधमालच्या जंगलात सुमारे १३ सदस्यांच्या गटाचे नेतृत्व करत होता. या गटातील बहुतांश सदस्य छत्तीसगडमधील होते आणि सुरक्षा दलांसाठी ते मोठे आव्हान ठरत होते.
नक्षलविरोधी अभियानाचे एडीजी संजीव पांडा यांनी या घटनेची पुष्टी करत सांगितले की, सर्व पाच माओवादी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांच्या शरणागतीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, संघटनेतील अंतर्गत वादही सुकरूच्या निर्णयामागील एक महत्त्वाचे कारण ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर्षी जानेवारीमध्ये सुकरूने आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आपल्या कनिष्ठ सहकारी अन्वेशची हत्या केली होती. या घटनेमुळे संघटनेत तणाव वाढला होता.
राज्याचे पोलीस महासंचालक वाय.बी. खुराना यांनी सांगितले की, कंधमाल, रायगडा आणि कालाहांडी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवाया, ड्रोनद्वारे देखरेख आणि कुटुंबीयांच्या आवाहनामुळे सुकरूवर दबाव वाढत गेला आणि त्याला अखेर शस्त्रे टाकावी लागली. अलीकडच्या काळात राज्यात नक्षलवाद्यांच्या शरणागतीचे प्रमाण वाढले आहे. ११ मार्च रोजी सानू पोट्टम यांच्या नेतृत्वाखाली १० माओवादी आणि १५ मार्च रोजी नकुल यांच्या नेतृत्वाखाली ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत राज्य माओवादीमुक्त करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रशासनाची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे.
सुकरूसारख्या वरिष्ठ नक्षलवाद्याच्या शरणागतीमुळे उर्वरित नक्षलवाद्यांचा मनोबल खचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तेही शासनाच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात परततील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


























































