
संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे आता अधिकृतपणे समोर आले आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या २८ विविध मुद्द्यांबाबत संगमेश्वर पंचायत समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामुळे धामणी ग्रामपंचायत प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
कागदावरच विकास; प्रत्यक्षात डल्ला
ग्रामस्थांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशीचे पाऊल उचलले होते. या चौकशी अहवालात जे मुद्दे समोर आले आहेत ते थक्क करणारे आहेत
अंगणवाडी किचन कट्टा: अंगणवाडीत किचन कट्टा न बांधताच त्याचे पैसे उचलण्यात आले आहेत.
वॉटर कुलर व शैक्षणिक साहित्य: शाळांसाठी वॉटर कुलर आणि शैक्षणिक साहित्य खरेदी न करताच सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला आहे.
कचरा कुंड्यांचा बनाव: वैयक्तिक मालकीच्या कचरा कुंड्या ग्रामपंचायतीने स्वतःच्या असल्याचे भासवल्या
इतर अनियमितता: गावात कचरा शेड, संरक्षक जाळी आणि पर्जन्यमापक केंद्र न बसवताच बिले काढण्यात आली आहेत.अशा अनेक गंभीर मुद्द्यांवर पंचायत समितीने आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केल्याने भ्रष्टाचाराचे स्वरूप उघड झाले आहे.
ग्रामस्थ आक्रमक; दोषींवर कारवाईची मागणी
या कथित भ्रष्टाचाराविरोधात धामणी गावातील ग्रामस्थ आता एकवटले आहेत. श्रीनिवास पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रमुख नागरिकांनी या लढ्यात सहभाग घेतला आहे. गावाच्या विकासासाठी येणारा पैसा अशा प्रकारे हडप केला जात असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही. दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या आंदोलनात श्रीनिवास पेंडसे, प्रवीण गुरव, नंदकुमार गुरव, दिगंबर लिंगायत, गौतम कांबळे, हरिश्चंद्र गुरव, चंद्रकांत बांबाडे, सुरेश साळवी, रवींद्र गुरव, प्रदीप गुरव, बाळकृष्ण बसवणकर, विश्वनाथ टाकळे आणि अनंत लिंगायत यांसह अनेक ग्रामस्थांचा सक्रिय समावेश आहे.
आम्ही २८ मुद्द्यांवर आधारित लेखी तक्रार केली होती. पंचायत समितीने आपल्या प्राथमिक चौकशी अहवालात प्रथमदर्शनी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले आहे. आता केवळ कागदोपत्री अहवाल नको, तर प्रत्यक्षात दोषींवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून वसुली व्हावी, हीच आमची भूमिका आहे.
– श्रीनिवास पेंडसे, धामणी (तक्रारदार)
































































