आकाश पाताळ एक करू, प्रकरणात कुणाचा बाप असेल तरी शोधून काढू; अजित पवार अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणात कर्नाटक सरकारने झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका मांडली. “अजितदादांच्या अपघातामागे जर काही घातपात असेल, तर आम्ही आकाश पाताळ एक करू आणि यात कुणाचाही बाप असेल तरी त्याला शोधून काढू,” असे ते म्हणाले.

या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच याप्रकरणी कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावरच भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, कर्नाटक सरकारला अशा प्रकारे एफआयआर दाखल करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. ज्यावेळी पीडित व्यक्ती स्वतः एफआयआर देण्याच्या स्थितीत नसते, तेव्हाच झिरो एफआयआरची तरतूद असते. हा झिरो एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असून, केवळ महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी आणि राजकीय हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.”

फडणवीस म्हणाले की, “गेल्या पाच-सात वर्षांत माझी आणि अजितदादांची जेवढी मैत्री होती, तेवढी कदाचितच इतरांची असेल. त्यामुळे एफआयआर दाखल होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न का करावे? अपघाताच्या घटनेनंतर नियमानुसार आधी एडीआर (ADR) दाखल होतो आणि त्यानंतर त्याचे रूपांतर एफआयआरमध्ये केले जाते. ही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जर कोणाला एफआयआरची घाई असेल, तर भारतीय न्याय संहितेनुसार न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. न्यायालय निर्देश देऊ शकते, परंतु राजकीय स्टंट म्हणून परराज्यात जाऊन तक्रार करणे चुकीचे आहे.”