तेलंगणात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील पारिगी मंडळातील लक्ष्मीदेवीपल्ली येथील स्टील फॅक्टरीत बुधवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. स्फोटानंतर परिसरात आगीच्या ज्वाला उसळल्या आणि संपूर्ण परिसरात दाट काळा धूर पसरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपासच्या गावांमध्येही आवाज ऐकू आला. प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. मात्र जखमींचा नक्की आकडा अद्याप कळू शकला नाही.

या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांना आणि माध्यमांना फॅक्टरीमध्ये प्रवेश नाकारल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. कंपनी व्यवस्थापनाने हा मोठा स्फोट नसून ट्रकचा टायर फुटल्याचा प्रकार होता, असा दावा केला आहे. कंपनी सत्य लपवण्याचा आणि अपघाताची तीव्रता कमी करून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. स्फोटाचे कारण निश्चित करण्यासाठी प्राथमिक तपास सुरू आहे. कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे विकाराबादच्या एसपी स्नेहा मेहरा यांनी सांगितले.