
देशभरात विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. या स्क्रीन टाईमला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वापरासंदर्भात धोरणाचा मसुदा जारी केला आहे. या मसुद्यात वेगवेगळ्या शिफारसी करण्यात आल्या असून यातील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे या विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी मोबाईल स्क्रीन टाईम दररोज केवळ एक तास असावा तसेच संध्याकाळी 7 नंतर इंटरनेट बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारच्या मसुद्यानुसार, विद्यार्थ्यांना झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीनपासून दूर ठेवले जावे. मोबाईलसाठी ‘चाइल्ड प्लॅन’ सुचवण्यात आला आहे. यामध्ये केवळ ऑडियोचा पर्याय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निश्चित वेळेनंतर इंटरनेट बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास 25 टक्के किशोरवयीन मुलांना इंटरनेटचे व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे झोप पुरेसी होत नाही. चिंता आणि लक्ष विचलित होण्यासारख्या समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर हे मसुदा धोरण ठरवण्यात आले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. शाळांमध्ये समुपदेशन मजबूत केले जाईल, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून ते डिजिटल व्यसनाची चिन्हे ओळखू शकतील आणि गरज पडल्यास मुलांना तज्ञांपर्यंत पोहोचवू शकतील.




























































