
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्या बैठकीत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केले. भाजपचे सरकार आल्यापासून राजकीय नेतृत्वाचे, अध्यात्माचे आणि हिंदुत्वाचे अधःपतन झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोणाचेही खासगी व्हिडीओ काढून ते व्हायरल करत त्यावर चर्चा करणे हे पत्रकारिता आणि राडकारणात योग्य नाही. महाराष्ट्रात राजकारणात राजकीय नेतृत्वाचे, अध्यात्माचे आणि हिंदुत्वाचे अधःपतन गेल्या काही वर्षात भाजपचे सरकार आल्यापासून होत आहे. त्यामुळे या विषयावर कितीवेळा, कोणावर आणि काय बोलायचे, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि काही पक्षांचे नेते ज्यांची नावे या प्रकरणात आली आहे, त्यांनी यावर बोलावे, त्यानंतर आम्ही बोलू,आता या विषयावर बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत अंतर्गत मतभेद नाहीत किंवा कोणाबाबत नाराजीही नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून आपण पक्षाचे सदस्य आहोत. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेते म्हणून ज्यांची नियुक्ती केली, त्यातील आपण एक नेते आहोत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचे आणि आपले नाते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अशा पसरवलेल्या बातम्यांचा आम्ही विचार केला असता तर एवढा मोठा पक्ष उभा राहिला नसता, असेही ते म्हणाले. त्यामुळए नाराजी मतभेद वैगरे नाहीत. या फक्त पसरवलेल्या बातम्या आहेत, असे ते म्हणाले.
भोंदू बाबाअशोक खरात प्रकरणी रोज नवनवी माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री आणि पोलीस खाते यांना आता शांतपणे काम करू देण्याची गरज आहे. रोज या मुद्द्यावर बोलून इतर महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही.
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला काहीही अर्थ नाही. जर पंतप्रधानच त्या बैठकीला नसतील तर आम्ही तिथे जाण्याला काहीही अर्थ नाही, असे ते म्हणाले.

























































