डॉलरपुढे रुपयांचे लोटांगण; पहिल्यांदाच 94.70 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला, महागाई वाढण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
RUPEE DOLLAR

जागतिक बाजारातील घडामोडी आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानी चलनाला मोठा फटका बसला आहे. डॉलरसमोर रुपयाच्या गटांगळ्या सुरूच आहे. शुक्रवारी 27 मार्च रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 94.70 इतक्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध भडकले. तेव्हापासून रुपयात सुमारे साडे तीन टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पहिल्यांदाच 94.50 च्या पातळीला ओलांडून गेला आहे. शुक्रवारी व्यवहारादरम्यान तो 94.70 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. आखातामध्ये सुरू असलेल्या युद्ध, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे ओढावलेले ऊर्जा संकट यामुळे हिंदुस्थानसारख्या जवळपास 85 टक्के तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशाच्या चलनावर दबाव वाढत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीही प्रति बॅलर 110 डॉलर्सवर पोहोचल्या आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावरही होत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची माघार

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हिंदुस्थानच्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. पैसे काढताना ते रुपयाचे रूपांतर डॉलरमध्ये करत असल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वेगवान झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करत आहे. बँक आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलर विकून रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

Share Market News – दोन दिवसात कमावले, ते एका तासात गमावले; शेअर बाजारात मोठी घसरण

खिशावर भार

रुपया कमकुवत झाल्याने हिंदुस्थानासाठी आयात महाग होईल. कच्च्या तेलासारख्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. याशिवाय, परदेशातून आयात केले जाणारे मोबाईल, लॅपटॉप यांसारखे इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग होतील, परदेशातील शिक्षण महाग होईल, देशाचा विकास दर कमी होईल.