Pune News – वयाची शंभरी गाठताना साक्षरतेचा ध्यास! जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी दिली ‘नवभारत साक्षरता’ परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिकण्याला वयाचे बंधन नसते’ याचा प्रत्यय जेजुरीमध्ये आला आहे. शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता’ अभियानांतर्गत रविवारी झालेल्या परीक्षेत लवथळेश्वर येथील 99 वर्षीय सदाशिव कोंडीबा साळवे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वयाच्या या टप्प्यावरही साक्षर होण्याच्या त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या केंद्रावर दोन परीक्षार्थी होते. 99 वर्षांचे सदाशिव साळवे यांच्यासह 75 वर्षीय विमल मारुती शिंदे यांनीही या वयात परीक्षेला बसून शिक्षणाप्रती आपली ओढ दाखवून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर आणि मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी दोन्ही परीक्षार्थींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक कुलदीप साळवे आणि शोभा पठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी यापूर्वी कधीही शाळेत गेलो नव्हतो. पण स्वयंसेवकांनी घरी येऊन मला अक्षरे आणि अंक ओळख करून दिली. आज प्रत्यक्ष शाळेत बाकावर बसून विद्यार्थ्यासारखी परीक्षा देताना खूप आनंद झाला. आता मला थोडे थोडे वाचता येते आणि मी अंकही मोजू शकतो.”

पुरंदर तालुक्यात 51 परीक्षार्थींचा सहभाग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, 15 वर्षांवरील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी हे अभियान राबवले जाते. पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • पुरंदर तालुक्यातील विविध केंद्रांवरून एकूण 51 परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली.
  • गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आणि स्वयंसेवकांमार्फत या प्रौढ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते.
  • पंचायत समितीच्या माध्यमातून हे अभियान तालुक्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

वर्ष 2030 पर्यंत 100 टक्के साक्षरता गाठण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र शासन पुरस्कृत हे ‘उल्लास’ अभियान राबवले जात आहे. 99 वर्षांच्या साळवे आजोबांनी दिलेल्या या परीक्षेमुळे समाजातील इतर निरक्षरांनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.