कथित आक्षेपार्ह व्हिडीओतील ट्रान्सवुमनच्या तक्रारीवरून गुन्हा, स्वतःच्या भावावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात एका ट्रान्सवुमनने कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या भावाविरोधात तक्रार दिली आहे. ब्लॅकमेलिंग, बदनामी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा गैरवापर करून बनावट व्हिडीओ तयार केल्याचा आरोप  तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ट्रान्सवुमनने आपला भाऊ रवी याच्याविरोधातच पोलिसांत तक्रार दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, आरोपीने दोन-तीन व्हिडीओ क्लिप्स एकत्र करून त्यामध्ये इतर व्यक्तीचे अश्लील फुटेज टाकून बनावट व्हिडीओ तयार केला आणि तो समाजमाध्यमावर प्रसारित केला. हे सर्व व्हिडीओ पूर्णपणे बनावट आहेत. माझा चेहरा एआयच्या सहाय्याने मॉर्फ करून चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी बदनामी करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून आरोपीकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचाही आरोप तिने केला
आहे.

समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला असून, त्यामध्ये एका विद्यमान मंत्र्याचा सहभाग असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र तक्रारदाराने या व्हिडीओंची सत्यता ठामपणे नाकारली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी ट्रान्सवुमनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.