
देशविघातक कृत्यांसह गोपनीय माहिती लीक केल्याचे भासवून तरुणीची 32 लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी चौघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. नीलेश वासमवार, शुभम जोंगड, अजय ओसद्रे, सिद्धांत जोंधळे अशी त्या चौघांची नावे आहेत.
तक्रारदार तरुणीला फेब्रुवारी महिन्यात अज्ञाताचा पह्न आला. त्याने तो पोलीस असल्याचे भासवले. पुलवामा हल्ल्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे एक सिमकार्ड मिळाले आले. ते सिमकार्ड आजीच्या नावावर असल्याच्या भूलथापा मारल्या. त्या कार्डवरून काही माहिती लीक झाली आहे. त्यामुळे आजीविरोधात देशविघातक कृत्यासह गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची भीती दाखवली.
ठगाने तिला मुंबई दहशतवाद विरोधी पथक, भारतीय रिझर्व्ह बँक, दिल्ली राष्ट्रीय तपास पथक, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयीन लोगोचा वापर करून काही कागदपत्रे पाठवली. तिला विश्वास बसावा म्हणून तिला व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याचे भासवले. त्यामुळे ती तरुणी घाबरली. तिच्या भीतीचा फायदा ठगाने घेतला. तरुणीसह तिच्या आजीला डिजिटल अटक केल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. ठगाने तिच्या खात्यातून 32 लाख 69 हजार रुपये उकळले. त्यानंतर ठगाने तिच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक नांदेड येथे पोहोचले. तेथून पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेतले.



























































