शितला देवी मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी 4 पुजाऱ्यांना अटक, महिलांना काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालंदा येथील शीतला मंदिरात झालेल्या अपघाताप्रकरणी, आता २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आता चार पुजाऱ्यांना अटकही केली आहे. सदर पुजाऱ्यांवर पैशांसाठी पूजा करण्याचा आणि महिलांना काठीने मारण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात दीपनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक मौसमी कुमारी यांच्या जबाबानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मंगळवार, ३१ मार्चला बिहार येथील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली. यात आठ महिला ठार झाल्या आणि अनेक जण जखमी झाले. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमल्याने प्रचंड गर्दी झाली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण चिरडले गेले, तेव्हा ही घटना घडली. बिहार सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

घटनास्थळावरील दृश्यांमध्ये मंदिराच्या आवारात मोठी गर्दी आणि गोंधळ दिसून आला. पोलीस अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दर मंगळवारी पाटणासह राज्यातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. अनेकांनी या अपघातासाठी गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “हे सर्व गैरव्यवस्थापनामुळे घडले.” तर दुसऱ्याने सांगितले, “कोणीही रांगेत उभे राहू इच्छित नव्हते आणि प्रत्येकाला दर्शनासाठी पहिले व्हायचे होते. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने गर्दी आणखी जास्त होती.”