
भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या एसआयटी कोठडीत असून त्याचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याचे याआधी समोर आले होते. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत खरातचे थेट कॉल रेकॉर्डस बाहेर काढले आहेत. अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा गेल्या वर्षभरातील सीडीआर हाती लागल्याचा दावा केला आहे. खरातच्या संपर्कात कोण कोण होते? कुणी किती वेळा त्याला कॉल केला? कोण किती वेळ बोलले? याबाबत दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अशोक खरात माझे गुरू आहेत असे रुपाली चाकणकर म्हणायच्या. खरात आणि चाकणकर यांच्यात 177 कॉल्स झाले आहेत. तर चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये 236 कॉल्स झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 कॉल्स झाले आहेत. यातील 10 इनकमींग, तर 7 आऊटगोइंग कॉल्स आहगेत. दोघांमध्ये 21 मिनिटे संभाषण झाले आहे. हे सर्व नॉर्मल कॉल असून व्हॉट्सअप आणि इतर कॉल्सची माहिती माझ्याकडे नाही, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकात पाटील आणि अशोक खरातमध्ये 8 फोन कॉल्स झाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे आणि अशोक खरातमध्येही 8 वेळा फोनवरून संपर्क झाला होता. एवढेच नाही तर मंत्री आशिष शेलार यांचाही एक फोन कॉल अशोक खरातसोबत झाला होता, असा दावा दमानिया यांनी केला.
अशोक खरातसोबत सर्वात जास्त वेळ कोण बोलले याचीही माहिती अंजली दमानिया यांनी दिली. यात पहिले नाव त्यांचे नाव तृप्ती खरात यांचे असून दुसर्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत. रुपाली चाकणकर 33,727 सेकंद अशोक खरातशी बोलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करावी आणि चौकशी करावी, अशी मागणई दमानिया यांनी केली.

























































