
तब्बल 13 वर्षांच्या सलामीहाराच्या पराभवांचा अपशकुनी सिलसिला मोडीत काढत आता विजयी आत्मविश्वासाने दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनेही दमदार सलामी देत विजयाची लय पकडली असून घरच्या मैदानावर हीच लय कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील ही लढत रंगतदार होणार, यात शंका नाही.
पृथ्वी शॉची एण्ट्री?
दिल्लीच्या फलंदाजीतील अस्थिरता अजूनही डोकेदुखी ठरत आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीने निराशा केली होती. मात्र समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या भागीदारीने संघाला सावरले. आता सलामीला स्थैर्य देण्यासाठी पृथ्वी शॉला संधी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. लुंगी एनगिडी आणि टी. नटराजन यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दिल्लीचा आघाडीचा विभाग मजबूत दिसतो. मधल्या षटकांत कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची फिरकी जोडी प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकते.
मुंबईचा धडाका कायम
कोलकाताविरुद्धच्या विजयात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील संघ संतुलित दिसत असला तरी सूर्यकुमार यादवच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोलंदाजीत बदलांची शक्यता
मुंबईकडून शार्दुल ठाकूरने प्रभावी कामगिरी केली, तर जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांनी अचूक मारा केला, मात्र इतर गोलंदाज अपेक्षेप्रमाणे चमकले नाहीत. त्यामुळे मिचेल सॅण्टनरला संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, पृथ्वी शॉला संधी मिळते का आणि सूर्यकुमार पूर्ण तंदुरुस्त आहे का, यावर या सामन्याचे चित्र ठरणार आहे.
उभय संघ-
दिल्ली कॅपिटल्स – अभिषेक पोरेल, के. एल. राहुल, नितीश राणा, समीर रिजवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुराना विजय, डेव्हिड मिलर, औकिब नबी, पथुम निसांका, लुंगी एनगिडी पृथ्वी शॉ, कायल जेमीसन, अजय जादव मंडल, टी नटराजन, माधव तिवारी, करुण नायर, साहिल पारख.
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंडय़ा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, रॉबिन मिंझ, रायन रिकल्टन, शेरफेन रदरपर्ह्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अथर्व अंकोलेकर, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, मयंक रावत, नमन धीर, मिचेल सॅण्टनर, शार्दुल ठाकूर, तिलक वर्मा, अश्विनी कुमार, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा, दीपक चाहर, ए.एम. गजनफर, मयंक माक&ंडे, मोहम्मद इजहार, रघु शर्मा.



























































